इतिहास

                             काळजावर कोरलेलं गाव ..... 

       आजच्या झोडग्याचा मी जसा साक्षीदार आहे तसाच 50 वर्षापूर्वी झोडगे कसे होते याविषयी माझे मन भूतकाळातील झोडग्याक्या एकूण सर्व गोष्टींचा आढावा घेऊ लागले . झोडगे -गाव हे जुनं गाव व नवं गाव अशा दोन गावात विभागाल गेलं आहे . जुनं गाव हे खरं ५०-६० वर्षापूर्वीच . हे गावाच्या एकूण रचनेवरून मानावं लागेल  . झोडगे गावाला एकूण चार दरवाजे होते . पूर्वाभिमुख असा मुख्य भव्य मोठा दरवाजा . दक्षिण उत्तर असे लहान दरवाजे, त्यांना आम्ही " खिडकी " असे म्हणत असू व पश्चिमेला तो गावात प्रवेश करायचा दरवाजा होता त्याला देवराव बाबजींची खिडकी म्हणून संबोधित असू . प्रत्यक्ष ही खिडकी नसून बर्‍यापैकी मोठा दरवाजा होता . पूर्व पश्चिम दरवाज्याला लागून देवड्या होत्या . अद्याप परयंता त्या अस्तीत्वात होत्या परंतु ; त्या मोडकळीस आल्यामुळे त्यांची जागा आज सीमेंट च्या कमांनींनी घेतली आहे . माझ्या लहानपनी आम्ही या दरवाज्यांच्या देवड्यांवर "उळीसुळी " हा खेळ खेळत असू . ५० वर्षापूर्वी रात्री हे दरवाजे बंद होत असत गावाच्या चारही बाजूच्या वेशी या मातीच्या भिंतीच्या होत्या . त्यामुळे बाहेरील संकटापासून गावाचे संरक्षण होत असे फार पूर्वी धुळे जिल्ह्यातील वार कुंडाने येथील "सायाजीराव " या दरोडेखोराने  रात्री झोडगे गावावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी गोफणीने दगड मारून  हल्ला परतविल्याची आख्यायिका आजही वयोवृद्ध सांगतात . 
                  
               मला आठवते ती माझी शाळा . १९६० साली मी सटवीत होतो . त्यावेळेच्या ७ विला  व्हर्नाक्युलर फायनल म्हणत , ही परीक्षा अतिशय प्रतिष्ठेची होती ती मालेगाव येथे होत असे . त्यावेळेला १ली ते ७वी या वर्गांना मुलोद्योग हा विषय होता . कापूस पिंजून त्याचे पेळु बनवणे , नंतर सूत कताई नंतर सूतपासून खादीचे 'बस्कर' बनवणे असा ७वी पर्यंतचा अभ्यासक्रम असे . त्यावेळेला मला जे गुरुजी होते ते ऋषितुल्य होते . बबनराव सुपडू सुतार असे त्यांचं नाव . 'रात्रीची ' शाळा हे अभियान त्यावेळेला गुरुजी चालवत घरी फक्त जेवणासाठी जायचे . कंदिलच्या प्रकाशात दहा वाजे पर्यन्त अभ्यास . सकाळी ५ वाजता गुरुजी स्वतः विद्यार्थ्यांना उठवून अभ्यास घेत म्हणजे एकूण २४ तास शाळा असे . परीक्षेला मालेगावला जावे लागे . पवारगल्लीत  आमची सोय केल्याचे आठवते . त्यावेळेला गावात हायस्कूल होती पेठगल्लीत (आताची 'वाणीगल्ली') एका पत्र्यावजा शेड मध्ये आमची ८ वी , विठ्ठल मंदिरात ९वी , बाळू शेठच्या माडीवर १० वी असे तीन वर्ग भरत . तीन वर्गांचे तीन शिक्षक व एक हेड मास्टर असा एकूण चार शिक्षकांचा स्टाफ होता . मी ८वीत असतांना वर्षभरातून 'लिंगायत ' नावच्या शिक्षकांनी आम्हाला एकाच प्रयोग दाखविला होता तो म्हणजे ' हवेला खालून दाब असतो' .आजही त्या प्रयोगाचे अप्रूप वाटते .

  

             झोडगे गाव हे मुंबई -आग्रा महामार्गावर आहे. ५० वर्षापूर्वी हा मार्ग एकेरी होता .गाड्यांची एवढी वरदळ नव्हती .युनियनच्या प्रवाशी गाड्या  होत्या .गाडी चालू करण्यासाठी प्रत्येक वेळीच ह्यांडल मारावे लागत असे.खाजगी वाहने जवळ जवळ नव्हतीच .तरीही शंकररावांची कलीपिली टॅक्सी आजही मला आठवते .ती धुळे मालेगाव अशी चालायची .धुळे ते झोडगा १ रु. व झोडगे ते मालेगाव ६० पै. भाडे होते . साधारण १९४० च्या सुमारास 'खान' म्हणून घासलेट विक्रेता होता .तो गावात घासलेट विक्री करायचा .मालेगाव दंगलीत पोफळे यांची इमारत जाळल्यामुळे त्याला हद्दपार केले होते .गल्लीतून रस्त्याचे दगडे बाजूला करायचा ,तो लाठी बहहदर होतो. 
             
             झोडगे गावाला हरीनाम सप्ताहाची १५० वर्षाची अखंड परंपरा आहे .विठ्ठल मंदिरातील मूर्ति या स्वयंभू आहेत .अशी आख्यायिका आहे .तसेच झोडगे गावाला फार मोठी सांस्कृतिक परंपरा आहे व आजही ती टिकून आहे .त्या काळी 'भोवाडा 'हा प्रकार अस्तीत्वात होता .वेगवेगळे मुखवते तयार करून संबळच्या तालावर कलाकार आपले नृत्य सादर करीत. कलाकाराने धारण केलेल्या मुखवट्याला सोंग असे म्हणत .त्या काळी नारायण दादाजी भिवसण ,नारायण भिल या कलाकरांचा आवर्जून उललेख केला पाहिजे . गणपती उत्सवात ७ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम चालत .रामराव  भाऊसाहेबांचा ओटा स्टेज म्हणून वापरत . हरिभाऊ देवरे ,छगन पिंजारी , शंकर खैरणार , दौलत अण्णा हे हरहुन्नरी कलाकार सात दिवस   सांस्कृतिक कार्यक्रम चालवत .  ५० वर्षापूर्वी 'तरुण ऐक्य मंडळ' नाटके बसवित असे . यात आत्माराम डोंगर देसले ( आत्माराम बाबा ) गोसावी , बावीस्कर कंडक्टर , यादव टेलर , भैय्यासाहेब गौतमराव , लादू नाना , पांडुरंग पितृभक्त हे हौसी कलाकार नाटकातभाग घेत असत . त्यांनी "डॉक्टर कैलास ,एकाच प्याला , फिर्याद,मायेचा संसार , भक्त पुंडलिक " आदि  नाटके बसवलेली आजही आठवतात . या सर्व गोष्टी काळाच्या ओघात लोप पावल्यात 
        
            त्या वेळेला वीज नव्हती चौकचौकात खुंड (कंदिलचे खांब ) होते . त्यावर काचेचे कंदील होते . रात्री ग्रामपंचायतीचे शिपाई 'ओंकार बोवा ' प्रत्येक दिव्यात घासलेट ओतून कानिल पेटवायचे हे ओंकार बोवा दवंडी पिटण्यात वाकुबदार होते . त्यावेळेस वैद्यकीय उपचाराची काय सोय होती ? गावात खाजगी डॉक्टर नव्हते . जिल्हा परिषदेचा दवाखाना होता . धुळे येथील ' भुरजमल गोविंदराम ' यांनी दवाखाना बांधून दिल्यामुळे त्यांचे नाव दिले होते त्या वेळचे वैद्यकीय अधिकारीच मिश्रकाचे काम करायचे वैद्यकीय उपचार एवढे प्रगत नव्हते . गोळ्यांपेक्षा  पातळ   औषधांवरच जास्त भर दिला जायचं . आजची वैद्यकीय उपचार पद्धहती पाहिल्यावर त्यावेळी जे उपचार केले जायचे ते आठवल्यावर हसूच येते . झोडग्याच्या शेजारी कंधाने म्हणून गाव आहे , तेथील गुलाब मारवाडी हे डॉक्टर नित्यनेमाने गावात येत असत . कोटाच्या खिशात सर्व दवाखाना असायचा . ते त्यावेळी ' मलेरिया स्पेशलिस्ट ' होते . धर्म शाळेच्या ओट्यावर सकाळी त्यांची प्रॅक्टीस सुरू व्हायची . गावात कोणी आजारी असल्यास ते व्हिजिटला जायचे . एक प्रकारे ही जन सेवाच होती . गुलाब डॉक्टरांचे ते भारदस्त व्यक्तिमत्व झोडगेवासीयांच्या कायम स्मरणात आहे .
        
            साधारणपणे प्रत्येक गावात मारुति मंदिर गावाच्या बाहेर असते परंतु झोडग्यात मात्र अति प्राचीन असे मारुति मंदिर गावात आहे झोडग्याचे महादेव हेमाडपंथी मंदिर हे झोडगेवासीयांचे भूषण आहे . येथे दर वर्षी महा शिवरात्रीला मोठी यात्रा भरते. या यात्रेचे विशेष आकर्षण म्हणजे गावाच्या मुख्य बाजार पेठेतून शिवमंदिराकडे वाजत गाजत निघणारी 'तगत्रावाची'(ज्याला लांगड असे म्हणतात) मिरवणूक व लोकनाट्य तमाशा तसेच कुसत्यांची दंगल होय . त्यावेळी बाहेर गावी नोकरीला असलेले व माहेर वासिनी आवर्जून गावात येतात . झोडगे ग्रामपंचायतीची स्थापना झाल्यानंतर पहिले सरपंच व्हायचा मान कै. देवराव रावजी पाटील यांना मिळाला . १९४१ ते १९४७ या कलावधीत झोडग्याचे सरपंच ते होते . विशेष म्हणजे त्या काळात निवडणूक बिनविरोध झाली . त्या काळात दोन प्रकारच्या पोलिस पाटिलकी होत्या एक मुलकी पाटील व दुसरे पोलिस पाटील . बरीच वर्षे कै . राघो नथू पाटील हे झोडग्याचे पोलिस पाटील होते . गावातील मारुति मंदिराजवळ चावडी (कचेरी) होती तेथे सरपंच व पोलिस पाटील न्याय निवडा करीत आज ही चावडी नाही ; मात्र कचेरी जवळील आड आजही पाण्याची तहान भागावतो म्हणून त्याला 'कचेरीचा आड ' म्हणतात १९७० सालापूर्वी झोडगे व परिसर पाण्याचे अत्यंत दूरभिक्ष होते . गाव व परिसरातील लांभी विहीर ,मोठ्याची विहीर , ताराचंद अप्पा यांची विहीर , आत्माराम बाबांची विहीर ,अमरावती पायबरा विहीर , दत्तूबाबा ब्राम्हण यांचा आड असे विविध जल स्त्रोत तेव्हा पासूत आजपर्यंत पाण्याची तहान शमवतात . आमबी विहिरीत तर पनी भरता भरता कित्येकांनी आपले प्राण गमावले आहे . त्याकाळी डोक्यावरुन बैलगाडीवरून पानी आणावे लागायचे . 
            
        १९५२ च्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान पंडित नहरू यांनी भेट दिली आहे .गावाने पाहिलेला हा पहिला व देशचाही पहिला पंतप्रधान ! नेहरूंच्या भेटीची झोडग्याच्या इतिहासात नोंद झाली . ते मालेगावहून पुराणेपाडा येथे जाताना देवराव बाबाजी यांनी त्यांना थांबवले व झोडग्याच्या काही समस्या मांडल्या . नहरूंनी शांतपणे सर्व समस्या ऐकून घेतल्या . आपल्या समस्या भाऊसाहेब हीरे यांना सांगावया असे बोलून ते पुरमेपाडा येथे त्याकाळी  जे मातीचे धारण बांधले जाणार होते त्याचे भूमिपूजनासाठी रवाना झाले .
  
               गावातील पेठ गल्लीत आजही पेशवेकालीन १५० सागाची खांब असलेली कोरीव नक्षी घरे आजही उभी आहेत . पेठगल्लीतील ( वाणी गल्लीतील) पुरातन असे श्री गणेश मंदिर आजही लक्षं वेधून घेते .या मंदिरातील गणेश मूर्ति व शिवलिंग स्वयंभू आहे. या समोरील विठ्ठल मंदिराचे आता जिर्णोध्हर झाला आहे . परंतु त्या पूर्वीचे लाकडी मंदिर अत्यंत सुरेख होते असे झोडग्याचे वयोवृद्ध वारकरी सांगतात . स्वतंत्र पूर्व काळात येथील भाऊशेठ खाणकारीचे  घराने सावकारी व्यवसायात प्रसिद्ध होते . ब्रिटीशांना व कोल्हापूरच्या राजांना व्याजणे पैसे देण्याचा उल्लेख आजही त्यांच्या खतावणीत आढळतो . नाशिक विभागात सर्वाधिक शेतसारा ते भरायचे . 

                  झोडगे गावाच्या नावाचा इतिहासही असा सांगितला जातो . गावाच्या सौंदर्यात भर पाडणारी दक्षिणेकडील टेकडी आहे. या टेकडीवरील झोटिंग बाबांचे (नाथपंथीय महाराज ) छोटेसे मंदिर आहे . या झोटिंग नावाचा कालानुरूप आपभ्रंश होऊन "झोडगे" हे नाव गावाला पडले आहे . 

                   झोडगे गाव महामार्गावर असल्याने आज गावात बदलाचे आधूनीकतेचे वारे वाहू लागले असले तरी गावातील आठवणींच्या पाऊल खुणा आजही त्याकाळात घेऊन जातात . गावातील याच पाऊल खुणांमुळे झोडगे गाव एक "काळजावर कोरलेलं गाव" म्हणून प्रत्येक झोडगेकराच्या मनात वसले आहे .    

                         
                                                                         लेखन - श्री . गुलाबराव देसाई 
                                                                                                             संकलन - श्री.मधु भांडारकर 
                                                                                                             संपादन - तुषार देसले 
                                                                                                             संदर्भ - दै. लोकमत 
________________________________________________________________________________