बुधवार, २० जुलै, २०११

हेमाडपंथी शिवालय ,झोडगे (मालेगाव)


"पावन तो देश" या शब्दांत संतांनी भारताचा गौरव केला आहे. भारताची सांस्कृतिक ओळख एकांगी तर मुळीच नाही. अध्यात्म, कला,साहित्य,शिल्प,स्थापत्य,गणित,ज्योतिष,अशा विविध शाखांमध्ये भारतीय संस्कृतिचे सर्वांगसुंदर दर्शन घडते. शिल्पकलेबाबत भारतीय शिल्पकला स्थापत्य ही जागतिक आश्चर्याची गोष्ट आहे. वेरुळ अजिंठा हे त्याचेच घटक होय.

  • हेमाडपंथी शिवालय:'हेमाद्री पंडित उर्फ़ हेमाड पंडित हा 'रामदेवराययादवांचा' ( तेराव्या शतकातला) राज्याचा 'श्रीकरानाधिप ' म्हणजेच अर्थमंत्री होता व रामदेवराय यादवांचा मुख्य प्रधान होता. साहित्य,शिल्प,धर्म,तीर्थयात्रा या सर्वात त्याला रूचि होती. त्याने भारतीयांची धार्मिकवृत्ति व तिर्थयात्रेमागिल भक्तिभाव लक्षात घेवुन ठिकठिकाणी, देवालय बांधण्याचं व्यापक पुण्यकर्म हाती घेतलं. त्यात स्वत:चा खास ठसा उमटवून गेला. मंदिर बांधकामात चुन्याचा वापर न करता केवळ दगडात मंदिर बांधण्याची पद्धत हेमाद्री पंडिताने सुरु केली. ही देवालये ' हेमाडपंथी' म्हणून शिल्प्वैशिष्ट्यांनी प्रसिद्ध झाली. महाराष्ट्र व अन्य प्रांतात आजही ही देवालये बाराव्या-तेराव्या शतकातील वैभवशाली शिल्पकलेचा,स्थापत्याचा उत्तम बोलका पुरावा आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ,नाशिक जिल्ह्यातील सिन्नर,देवळाने,झोडगे,नगरजिल्ह्यातील श्रीगोंदे,कोकमठाण,रतनवाडी,धुळे जिल्ह्यातील बलसाणे,मेथी,जळगाव जिल्ह्यातील चांगदेव,वाघाळी,सातारा जिल्ह्यातील फलटणया सर्व ठिकाणची मंदिरे ही यादवकालीन व हेमाडपंथी शैलीतील आहे. हेमाडपंथी मंदिराच्या या मालिकेत स्वताच्या खास वैशिष्ट्यांनी आजही शिल्पकलेचे असंख्य कलात्मक नमुने अंगाखांद्यावर खेळवत उभे आहेत. मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव-धुळे दरम्यान "झोडगे" गाव आहे गावाच्या दक्षिणेस असेच पुरातन शिवालय आहे. स्थान महात्म्याचा प्रथम विचार करून हेमाड पंडिताने ही जागा निवडली असावी.मंदिराच्या दक्षिणेला आधारावडासारखा झुटुंबा (झोटिंग) डोंगर आहे. झुटुंबा उर्फ झोटिंगबाबा या नाथपंथीय साधूंच्या वास्तव्यानं या डोंगराला 'झुटुंबा डोंगर' म्हणून संबोधले जाते. साधूंच्या वास्तव्य भूमीत तीर्थमंदिर वा पवित्र तीर्थस्थळी साधूंचा वास असतोच,या तत्वाने हेमाद्री पंडिताने मंदिराची जागा निवडली असावी. शिवाय इथं मंदिराच्या बांधकामाला लागणारी पक्क्या दगडांची महत्वाची सामग्री उपलब्ध असावी. या देवालयाच्या दक्षिणेला टेकडीच्या पायथ्यालगत मोठा खड्डा आहे. या खड्ड्यात चार-सहा फुट खोलीचे सुरुंग लावून दगड काढले आहेत. ऊन,वर,पाऊस,थंडी या सर्व आपत्यांच्या चाचण्यात पाषाणाचे अभंगात्व जोखले गेले. जे भंगले ते पाषाण वगळले गेले व कामाचे पाषाण शेकडो लिटर दुधात भिजवले गेले. अशा कसोट्यांतून मृदू;पण टिकाऊ पाषाणावर नंतर कलावंतांनी मनातली सुप्त शिल्पकला साकारली आहे.झुटुंबा बाबांसारख्या सिद्ध तसेच सामान्य साधकांसाठी भव्य शिवालय निर्माण झाले.
  • बाह्य रचना - सारीपाठाच्या चौकटीसारखी नागर पद्धतीची देवालयाची रचना आहे. मोठ्यात मोठ्या व छोट्यात छोट्या दगडांची इंच-इंच जागा कलाकुसरीतून सुटलेली नाही. पौराणिक विषयांवरील शिल्पांनी मंदिराला सर्वार्थ अलंकृत केले आहे. शिवाय मोठ्या मंदिराच्या छोट्या छोट्या प्रतिकृती (उरुश्रुंगे) कळसापर्यंत मापबाद्धपणे बसविल्या आहेत. अत्यंत प्रवाही व ओघवत्या आकाराची काही प्रमाणबद्ध कामशिल्पे पाहणाऱ्याच लक्ष वेधून घेतात व खिळवून ठेवतात. जमिनीपासून सर्व बाजूंनी समांतर व भौतिक नियमांत पाषाणाची प्रत्येक कडा भरलेला आहे. मंदिराला दर्शनी भागावर व डाव्या-उजव्या बाजूला विलक्षण प्रवाही व लयदार गोलाइनं तयार केलेला अप्रतिम महिरप व त्यातील पशुशिल्प नजर हटू देत नाही.शिवाचे वाहन महानंदीला सन्मुख असे प्रशस्त पश्चिमाभिमुख प्रवेशद्वार आहे. जमिनीपासून ४०-५० फुटांवर साधना,उपासनेसाठी खोली आहे. खोलीच्या सर्व बाजूला उभ्या पाषाणांना घट्ट पकडून ठेवणाऱ्या पाषाणांची बैठक करून कळसाकडील बांधकाम चढवत नेलं आहे. मध्यानीच्या सूर्याची किरणं शिवपिंडीचं दर्शन घेऊ शकतील,असे छोटे छिद्र कळसावर आहे. पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारामुळे मावळतीलाही गाभाऱ्यात सूर्यप्रकाश पोहोचतो व गाभाऱ्यात भगव्या प्रकाशात न्हाऊन निघतो.


  • अंतर रचना-प्रवेशद्वार ते सभामंडपादरम्यान दोन्ही बाजूंना ओटे आहेत. चार देखणे खांब दर्शनीय आहेत. या ओट्यावर पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी विटांच्या आकाराचे खड्डे आहेत. पक्ष्यांच्या वावरामुळे परिसराची मोहकता वाढेल असा हेतू या मागे असावा. सभामंडपात दोन भव्य अखंड अलंकृत खांब आहे व आता प्रशस्त सभामंडप,वर निमुळत्या वर्तुळाकार पायऱ्या, पायऱ्यांच्या पाषाण मांडणीत रंभा,उर्वशी,तिलोत्तमा,आदी स्वर्गीय अप्सरांचे नृत्यशिल्प,पखवाज व संगीत वादकांची अप्रतिम शिल्पयोजना केली आहे. सध्या यापैकी काही शिल्पे खोडकर मुलांच्या उपद्व्यापामुळे फुटली आहेत व ते भग्न आवशेष हि बेपत्ता आहेत. सभामंडपाच्या डाव्या-उजव्या बाजूला दोन खोल्या आहेत.शिल्पशास्त्रात त्यांना "भोगमंडप" म्हणतात. या खोल्यात देवाला अर्पण करावयाच्या वस्तू ठेवल्या जात तसेच या खोल्यात आसनासाठी पाषाण ठेवले असल्याने त्यांचा उपयोग योगसाधना, उपासनेसाठी होत असावा पूर्व पश्चिमेकडून आवश्यक तेवढाच प्रकाश येण्यासाठी चौकात खिडक्या आहेत. सभामंडप ते गाभारा दरम्यानच्या अंतरालगत गाभारा प्रवेशद्वाराजवळ विकारांना आत ओढण्याचा संदेश देणारे कासव आहे. गाभारा प्रवेशद्वारजवळ दोन्ही उभ्या बाजूंना वर्गातील यक्ष,किन्नर,गंधर्वाचे इशस्तवन गाणारे शिल्प व वरील आडव्या बाजूच्या मध्यभागी विघ्नहर्ता या सर्वांचे दर्शन घडते. भक्तांचा अहंकार नम्र करावा म्हणून कमी उंचीचे प्रवेशद्वार आहे दोन पायऱ्या उतरल्या की गाभाऱ्यात उत्तराभीमुखी शिवलिंग आहे. अत्यंत गंभीर,पवित्र,सात्विक अशा या मंद प्रकाशात गाभाऱ्यात विलक्षन शांतता जाणवते.
  • समारोप
    झोडगे हे गाव महामार्गावर असल्याने देशी-विदेशी पर्यटक/प्रवासी या शिवालाचे सहज दर्शन घेण्यास नियोजित असोनसो शिवमंदिर पाहण्यासाठी लोक इथे थांबतात. पुरातत्व खाते व शासन वांझ दायित्वाची निशाणी म्हणून एक पाटी मंदिराजवळ रोवली आहे. ऋतूंचे प्रहार वर्षानुवर्षे शिवालय झेलत आहे. काहीजणांचा खोडकरपणाही उपद्रवी ठरत आहे. वैयक्तिक जबाबदारीबाबत एकूणच उदासीनता असल्याने महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षित स्वभावाचा इथेही प्रत्यय येतो. मंदिराची काळजी घेतली पाहिजे असे सर्वांचे म्हणणे आहे. पण...पण "मला काय त्याचे!" या वृत्तीमुळे या शिल्पस्थापत्याच्या ठेव्याची "असुनी नाथ मी अनाथ " अशी स्थिती झाली आहे. हे मंदिर कागदोपत्री पुरातत्व म्हणजेच शासनाच्या ताब्यात असल्याने त्याच्या जपावानुकीसाठी कोठूनही प्रयत्न नाहीत. त्यामुळे अतिप्राचीन शिल्पकलेचा हा नमुना येत्या वर्षात " याची देही याची डोळा " उधवस्त झाल्यास आश्चर्य वाटू नये!
    आज थोड्यातरी सुअवस्थेत असलेला हा अनमोल ठेवा अशीच "उदासीनता "कायम राहिल्यास या मंदिराची अवस्था समोरील आशाच "उदासीनतेचा "बळी ठरलेले पडक्या मंदिरासारखी झाल्यास नवल वाटायला नको .......!
  • इतर हेमाडपंथी मंदिरांसाठी इथे क्लिक करा .
    - कमलाकर देसले

३ टिप्पण्या: